हंसी तो फंसीचे कधी हंसा तो फंसा होत नाही.
जग बदलले तरी त्याचे हंसी तो फंसीचे खुळ काही जात नाही..

ती हसते पाहून आजूबाजूचा नजारा,
त्याला वाटतो तो एक प्रेमाचा इशारा.
तो कधी तिच्या लक्षातही येत नाही,
तरी त्याचे हंसी तो फंसीचे खुळ काही जात नाही..

तिची त्याच्याकडे कधीच नजर जात नाही,
पण त्याचे तिच्याकडे अजिबात दुर्लक्ष होत नाही.
प्रत्येक वेळी ती त्याला टाळत राही,
तरी त्याचे हंसी तो फंसीचे खुळ काही जात नाही..

एकतर्फी प्रेमात तिची होते नेहमप्रमाणे गोची,
त्याला उगाच वाटत राहतं ती फक्त त्याची.
ती कधी त्याला सावलीला उभी करत नाही,
तरी त्याचे हंसी तो फंसीचे खुळ काही जात नाही..

तिच्या प्रेमाचा बसत नाही कसलाही मेळ,
मग सुरू होतो त्याचा लपंडावचा खेळ.
तिच्या जीवनामध्ये याला काहीच न स्थान राही,
तरी त्याचे हंसी तो फंसीचे खुळ काही जात नाही..

तिने पोटतिडकीने त्याला दिला जरी कितीही नकार,
तिला पटवण्यासाठी करतो तो ब्लॅकमेलिंगचे ना ना प्रकार.
ती त्याच्या या फालतूपणाला कधी जुमानत नाही,
तरी त्याचे हंसी तो फंसीचे खुळ काही जात नाही..

त्याच्या या प्रेमाच्या वेडात होतो तिचा सारखा अपमान,
त्याला वाटते आपण करतो तिच्या प्रेमापोटी जीवाचे रान.
त्यातून सुटण्यासाठी करे ती प्रयत्न सगळे काही,
तरी त्याचे हंसी तो फंसीचे खुळ काही जात नाही..

तिची चूक नसताना ही तिलाच दोष देई जग सारा,
कधी बंद होईल बरं हा एकतर्फी प्रेमाचा पसारा.
निर्दोष सिध्द करण्यासाठी ती स्वतःला संपवू पाही,
तरी त्याचे हंसी तो फंसीचे खुळ काही जात नाही..
-प्रेमा