बास झालं आता जगाचा विचार करणं कधीतरी
स्वतःमध्ये पण तू डोकावून पाहिलं पाहिजे.
संसाराच्या रडगाण्यात तू तुलाच न विसरता
कधीतरी स्वतःसाठी पण जगलं पाहिजे.☺️

कष्टाची कमाई जमा करून नवऱ्याला न देता
त्याच्या त्रासाला तू दोन हात केलं पाहिजे.
पाहिलेल्या स्वप्नांनी उंच भरारी घेऊन
केलेल्या कष्टाचं चीज साकार झालं पाहिजे.☺️

आपण मिळवलेल्या ज्ञानाचा साठा कामी यावा
म्हणून गरजूंना आवश्यक ज्ञान तू दिलं पाहिजे.
जीवन जगण्याच्या कसोटीत टिकून राहण्यासाठी
नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेतलं पाहिजे.☺️

लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता कधीतरी
तुला स्वतःला कामात झोकून देता आलं पाहिजे.
जग दूनिया चालायची कधीही थांबणार नाही म्हणून
स्वतःच्याच आवडत्या छंदात रमून गेलं पाहिजे.☺️

समाजाने बाईसाठी नको ते घालून दिलेल्या
पुरुषप्रधान संस्कृतीतील बंधनांना तू तोडलं पाहिजे.
आपल्यातील चांगले संस्कार आणि माणुसकीने
भेदभाव न करता माणसांना एकमेकांशी जोडलं पाहिजे.☺️

जीवनात आलेल्या संकटाना धाडसाने तोंड देत
झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून तू विसरलं पाहिजे.
परत एकदा धेर्याने सामोरे जात घडू पाहणाऱ्या
नवीन बदलांनी स्वतःच्या स्वप्नांना साकारलं पाहिजे.☺️
– प्रेमा